Friday, January 25, 2013

जेव्हा मी माझा असतो..

जेव्हा मी माझा असतो..


रातीच्या काळ्या किनाराला जेव्हा पहाट उजेडाची किनार देते.. तेव्हा मी माझा असतो..
संथ वाहणाऱ्या नदीला जिथे गती येणं थांबतं...तेव्हा मी माझा असतो..
मला काय वाटते, मला कसे वाटते, मला का वाटते ह्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा जग मागत नाही... तेव्हा मी माझा असतो..

मी माझा असतो तेव्हा जग निद्राधीन झालेले असते.. आणि जे जागे असतात ते डोळे घट्ट मिटून मला दाखवतात ... आम्ही तर झोपलो आहोत.. आम्हाला काय ठाऊक तुला की म्हणायचं आहे ते..
बहुतेक तुला वेड लागले असावे.. जग कित्ती कित्ती सुंदर आहे.. बघ तरी..  सगळे कसे निरागसपणे तुझ्या असण्यावर प्रेम करत असतात ते.
मग ते प्रेम मला का दिसत नाही ? कि मी प्रेमआंधळा आहे ? मायेचा स्पर्श मला का होत नाही ? कायम व्यावहारिक विचार का दिसतात ? खरच सांगतो तेव्हा मी माझ्यात नसतो..

एक दिवस येईल की मला जे मागायचे होते ते द्यायला लोक ओंजळ भरभरून पुढे करतील..
तेव्हा चंदनाच्या हाराखाली तसबिरीत.. मी माझा नसेन.... मी आहे म्हणून कुणाचे पाऊल पुढे चालले नाही.. मी नसेन तेव्हा कुणाचे अडणार नाही..
सामान्य मी.. असाच जाणार की हो एकदाचा .. त्यात काय एवढे ?

आज मात्र माझ्या जेत्या समयी.. मी कुणाचाच नाही... जिथे माझ्या असण्यावर माझाच विश्वास नाही.. तिथे मात्र मी नक्कीच माझा मी असतो..